श्री समर्थची २५ वी वार्षिक सभा उत्साहात पार पडली
चिंबळी फाटा : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिंबळी फाटा संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी मोशी येथील हॉटेल मोशी इंपिरियल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सभेच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे प्राध्यापक श्री. विलास लिंबळे यांनी सभासदांना सहकार कायदा व सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
सभेमध्ये आर्थिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. तसेच संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. याशिवाय सेवक कल्याण निधी व सभासद कल्याण निधीच्या नियमावलीसही सभासदांनी मान्यता दिली.
संस्थेच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून खेड तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. आर्थिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चिंबळी फाटा, सोमाटणे, चऱ्होली आणि नाणेकरवाडी या शाखांना उत्कृष्ट शाखा म्हणुन गौरविण्यात आले व दिशा मुऱ्हे, आदित्य गवारे, सौरभ बोत्रे, प्रियांका येळवंडे, तुषार ठाकुर, सनी शिंदे, आम्रपाली बवले, संतोष डांगे यांनी गुणवंत कर्मचारी व दिनेश सरोदे यांना उत्कृष्ट शाखा विकासक म्हणुन गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ श्री. संभाजीशेठ गवारी व संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारी यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पतसंस्था तसेच मल्टिस्टेटच्या सर्व शाखांचे संचालक, सल्लागार मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक व कामकाज संस्थेचे सीईओ श्री. अमोल गवारे, श्री. अर्जुन जाधव व श्री. प्रज्वल लेंडघर यांनी पाहिले. सूत्रसंचालन श्री. किसन देशमुख व श्री. प्रदीप लांडगे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली.





