संबंधित बातम्या
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊ आग्रा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. भरधाव कार दुसऱ्या बाजूने निघालेल्या खासगी बसला धडकली. यानंतर दोन्ही गाड्या रस्त्यावरून २० फूट खाली घसरल्या. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी मानवी साखळी बनवून जखमींना बाहेर काढलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
नागालँडची खासगी बस रायबरेलीहून ६० प्रवाशांना घेऊन दिल्लीला जात होती. तर दुसऱ्या बाजूने आग्र्याकडून लखनऊला जाणारी कार अनियंत्रित झाली. दुभाजक तोडून अचानक बससमोर आली. कारला धडकण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही वाहनांची धडक झाली. यानंतर बस आणि कार रस्त्याकडेला २० फूट खाली कोसळली.
अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. बचावकार्य राबवत जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. तर अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील तिघे जण अपघातात मृत्यूमुखी पडले असून यात मायलेकाचा समावेश आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. बसमधील चौघांचा मृत्यू झाला असून यातील दोघांची ओळख पटलेली नाही. जखमींमध्ये सर्वाधिक अमेठी, रायबरेली आणि लखनऊमधील प्रवाशांचा समावेश आहे.
एसएसपी संजय वर्मा यांनी सांगितलं की, कार दुसऱ्या बाजूच्या लेनवर आल्यानं हा भीषण अपघात झाला. या अपघाताची चौकशी केली जात आहे. कार आणि बसमध्ये असलेल्या सात जणांचाा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर ४० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. प्रशासकीय अधिकारी जखमींच्या उपचाराकडे लक्ष ठेवून आहेत. काहींना किरकोळ दुखापत झाली होती त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
- First Published :