श्री समर्थ पतसंस्थेचा रौप्य महोत्सव वर्ष सांगता समारंभ उत्साहात संपन्न

 

चिंबळी फाटा : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिंबळी फाटा या संस्थेचा रौप्य महोत्सव वर्ष सांगता समारंभ दिनांक २१ मे रोजी मोशी येथील सिझन बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनिलजी चांदेरे, मा. अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनुराग जैद, सागर मुऱ्हे, कमलताई कड, गौरीताई चंदनदादा मुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाची वाटचाल संस्थेचे सीईओ अमोल गवारे यांनी वाचनातून तसेच व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांसमोर सादर केली. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेताना विविध शाखांचा विस्तार, वाढता व्यवसाय आणि सभासदांचा विश्वास अधोरेखित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गवारी यांनी संस्थेची भविष्यातील ध्येय-धोरणे सभासदांसमोर मांडली. आगामी काळात अधिक शाखा विस्तार, व्यवसाय वृद्धी तसेच सभासदांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनिलजी चांदेरे तसेच माजी अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ संभाजीशेठ गवारी यांनी सभासदांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सचिव विद्याताई गवारी, संचालक विनोद माझिरे, देवेंद्र घोटकुले तसेच सभासद प्रशांत कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश टोपे, अर्जुन जाधव आणि संतोष साकोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष गवारी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

news portal development company in india
soical Sharing