श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘श्री समर्थ नवदुर्गा पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न!
विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; प्रेरणादायी मार्गदर्शनासह दांडिया महोत्सवाची रंगत!
चाकण (प्रतिनिधी) :
‘कर्तृत्वाचा गौरव, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि प्रेरणेचा जागर’ या संकल्पनेतून श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, मोई संचलित श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज, नाणेकरवाडी येथे शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ‘श्री समर्थ नवदुर्गा पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा व दांडिया महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आपल्या जिद्द, संघर्ष, परिश्रम आणि कर्तृत्वाच्या बळावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेणे तसेच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांची प्रेरणा निर्माण करणे, या उदात्त उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात पोलीस सेवा व महिला सुरक्षा क्षेत्रातील सौ. वैशाली खंडागळे, महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्य क्षेत्रातील सौ. सारिका कड, साहित्य व ग्रंथसेवा क्षेत्रातील डॉ. मयुरी हनुमंत भवारी, वैद्यकीय व नेत्ररोग चिकित्सा क्षेत्रातील डॉ. स्मिता राऊत, आयुर्वेद व आरोग्यसेवा क्षेत्रातील डॉ. लता सूर्यकांत पुणे , राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सौ. दीपा संतोष नाणेकर, विधी व न्यायसेवा क्षेत्रातील सौ ज्योती मनोहर जंबुकर, तसेच महिला स्वावलंबन व वाहतूक सेवा क्षेत्रातील सौ. नीता परसरामपुरिया अशा नऊ कर्तृत्ववान महिलांना ‘श्री समर्थ नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
*या कार्यक्रमासाठी श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव बबनराव गवारे सर, संस्थेच्या सचिव तथा संचालिका मा. विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम,
प्राचार्य सौ विद्या बापू पवार , COO सौ अश्विनी देवकर मॅडम, उपप्राचार्या अंकिता बोरकर , दिगंबर कुलकर्णी , तेजश्री बंडगर, हसीना मणियार, आरती क्षीरसागर , वंदना यादव , अर्चना पोखरकर , पर्यवेक्षक अजय स्वामी यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या आधुनिक युगात महिला केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित न राहता शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, व्यवसाय, आरोग्यसेवा, सामाजिक कार्य, प्रशासन आणि विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. अशा महिलांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा आणि त्यांच्या यशोगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने संस्थेच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
पुरस्कार वितरणानंतर सन्मानित महिलांनी आपल्या मनोगतातून विविध क्षेत्रांतील अनुभव, संघर्षमय प्रवास, यशामागील परिश्रम आणि आयुष्यात आलेल्या आव्हानांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ध्येय निश्चिती, सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
महिलांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून शिक्षण, स्वावलंबन आणि कर्तृत्वाच्या बळावर समाजामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक पारंपरिक वेशभूषा, उत्साहपूर्ण संगीत आणि दांडियाच्या तालावर विद्यार्थी, पालक व उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला.
या महोत्सवामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. स्त्रीशक्तीच्या सन्मानाबरोबरच भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना पोखरकर व अजय स्वामी यांनी केले. महिलांच्या संघर्षगाथा, कर्तृत्व, प्रेरणादायी विचार आणि स्त्रीशक्तीचा गौरव करणाऱ्या काव्यपंक्तींमुळे पुरस्कार वितरण सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली.
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
स्त्रीशक्तीचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.






