श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज डुडूळगाव मध्ये स्त्रीशक्तीचा गौरव!
‘श्री समर्थ नवदुर्गा पुरस्कार २०२६’ ने नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; दांडिया महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
डुडूळगाव (प्रतिनिधी) : कर्तृत्वाचा गौरव, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि प्रेरणेचा जागर घडविण्याच्या उद्देशाने श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, मोई संचलित श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, डुडूळगाव येथे रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘श्री समर्थ नवदुर्गा पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा आणि गरबा-दांडिया महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
समाजातील महिलांच्या संघर्षाचा, जिद्दीचा, परिश्रमाचा आणि यशस्वी वाटचालीचा सन्मान करणे, तसेच नव्या पिढीतील मुलींना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांची प्रेरणा देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या सोहळ्यात पोलीस सेवा व महिला सुरक्षा क्षेत्रातील पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या सोनाली सपकाळ, महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्यासाठी सौ. सुनीता सूर्यवंशी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रांजली ताठे (कुदळे), दंतचिकित्सा तज्ञ डॉ. स्नेहल पिनाटे, तसेच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रियंका मंडलिक आणि सौ. पूनम तळेगावकर, एकल माता असूनही आपल्या संपूर्ण कुटुंबाची एकटीने समर्थपणे सांभाळणाऱ्या आरती वाणी, सौंदर्य क्षेत्रात आपल्या कौशल्याने मेहनतीने आणि कल्पकतेने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. असावरी कळमकर आणि आरोग्यसेवा क्षेत्रात परिचारिका म्हणून समर्पित भावनेने रुग्णांची सेवा करणाऱ्या सौ. मनीषा बाभळे या नऊ महिलांना ‘श्री समर्थ नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव बबनराव गवारे सर आणि संस्थेच्या सचिव तथा संचालिका मा. विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राज पवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्या मयुरी कुरणे,समन्वयक सौ.नेहा बांगर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या आधुनिक युगात महिला शिक्षण, आरोग्यसेवा, सामाजिक कार्य, प्रशासन, उद्योग, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या यशोगाथा समाजासमोर आणणे आणि विद्यार्थिनींना प्रेरणा देणे, या हेतूने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महिलांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून शिक्षण, स्वावलंबन आणि मेहनतीच्या बळावर समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे, असा प्रेरणादायी संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
दांडियाच्या तालावर रंगला आनंदोत्सव!
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर विद्यालयाच्या भव्य प्रांगणात गरबा व दांडिया महोत्सव रंगला. आकर्षक पारंपरिक वेशभूषा, उत्साहवर्धक संगीत आणि दांडियाच्या तालावर विद्यार्थी, तरुण-तरुणी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर आनंद, उत्साह आणि चैतन्याने भारून गेला.
स्त्रीशक्तीचा सन्मान आणि भारतीय संस्कृती व परंपरेचा सुंदर संगम घडविणारा हा महोत्सव उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. महिलांच्या संघर्षगाथा, कर्तृत्व आणि प्रेरणादायी विचारांना उजाळा देणाऱ्या काव्यपंक्तींनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या मयुरी कुरणे व आभार प्रदर्शन समन्वयक सौ. नेहा बांगर यांनी केले. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, स्त्रीशक्तीचा जागर आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा डुडूळगाव परिसरात विशेष लक्षवेधी ठरला.






