श्री समर्थ प्री-प्रायमरी स्कूल, केळगाव येथे ‘नवदुर्गा पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न

श्री समर्थ प्री-प्रायमरी स्कूल, केळगाव येथे ‘नवदुर्गा पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; नारीशक्तीचा गौरव

केळगाव, दि. १७ ऑक्टोबर : श्री समर्थ प्री-प्रायमरी स्कूल, केळगाव येथे नवरात्रीचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणारा ‘नवदुर्गा पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा गौरव करणे आणि त्यांच्या कार्यातून इतर महिलांना प्रेरणा देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमात रसिका नितीन कुटे (पोलीस उपनिरीक्षक – PSI), मंगळ बाळू तांबोळी (महिला बचत गट CRP व केळगावमधील पहिला महिला बचत गट सुरू करणाऱ्या महिला) आणि पौर्णिमा ज्ञानेश्वर घुंडरे (शिक्षिका व क्लासेस संचालिका) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

महिलांमधील जिद्द, आत्मविश्वास, संघर्षशील वृत्ती, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा गौरव करणे, ही या पुरस्कारामागील संकल्पना आहे. आपल्या कर्तृत्वाने समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या महिलांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर आणि समाजासमोर ठेवण्याचा स्तुत्य प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांची ओळख, नवदुर्गा पुरस्कार वितरण, नवदेव पुरस्कार वितरण, मान्यवरांचे मनोगत आणि आभार प्रदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष मा. श्री शिवाजी बबनराव गवारे, शाळेच्या सचिव मा. विद्याताई गवारे, शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी राहुल वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी सुमित एकनाथ पवळे, रूपाली सुमित पवळे, शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग आणि सर्व पालकांचे सहकार्य लाभले.

महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा हा सोहळा समाजात नारीशक्तीचा गौरव करणारा आणि इतर महिलांना प्रेरणा देणारा उपक्रम ठरला.

‘कर्तृत्वाचा सन्मान, नारीशक्तीचा अभिमान!’ या प्रेरणादायी विचारातून कार्यक्रमाने महिलांच्या सामर्थ्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला.

news portal development company in india
Recent Posts