श्री समर्थ विद्याप्रबोधिनी महाळुंगे इंगळे येथे कर्तृत्वाचा गौरव आणि स्त्रीशक्तीचा सन्मान ! नवदुर्गा पुरस्कारांनी ९ महिला सन्मानित !
नारीशक्तीचा गौरव आणि दांडियाच्या तालावर थिरकले तरुण – तरुणी अन् पालक !
महाळुंगे इंगळे (प्रतिनिधी) :
‘कर्तृत्वाचा गौरव, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि प्रेरणेचा जागर’ या संकल्पनेतून श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, मोई संचलित श्री समर्थ विद्याप्रबोधिनी, महाळुंगे इंगळे येथे बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ‘श्री समर्थ नवदुर्गा पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा व दांडिया महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आपल्या जिद्द, संघर्ष, परिश्रम आणि कर्तृत्वाच्या बळावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेणे तसेच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांची प्रेरणा निर्माण करणे, या उदात्त उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात पोलीस सेवा व महिला सुरक्षा क्षेत्रातील जोत्स्ना खरात, त्याच्यावतीने काटकर मॅडम यांनी पुरस्कार स्वीकारले. महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्य क्षेत्रातील सौ. प्रतिज्ञा अतुल निंबाळकर, यशस्वी उद्योजिका सुवर्णा आप्पाराव घाडगे, त्वचा आणि सौदर्यचिकित्सा क्षेत्रातील डॉ. आर्झु चंदमीया जामदार, कॉम्प्युटर सायन्स व इंजिनियरींग मध्ये डॉक्टरेट झालेल्या डॉ. प्रा. सिमा महालुंगकर , अभिनव फॉर्मच्या माध्यमातून सेंद्रीय शेती करणाऱ्या सौ. प्रिया सागर जाधव, ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजाराला मात करून नेहमी सामाजिक सहकार्य करणाऱ्या सौ. ममता कुशे, तसेच सगळ्यांच्या समस्या निवारणास सज्ज असणाऱ्या वर्षा स्वप्नील लकारिया , रायफल आणि पिस्तूल , लाठी – काठी व दांडपट्टा यासारख्या पारंपारिक भारतीय युद्धकलेमध्ये पारंगत असलेल्या सौ. हर्षदा मोकाशी अशा नऊ कर्तृत्ववान महिलांना ‘श्री समर्थ नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव बबनराव गवारे सर, संस्थेच्या सचिव तथा संचालिका मा. विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला . प्राचार्य वर्षा देशमुख मॅडम, समन्वयक सौ. अलका मॅडम, यांच्यासह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या आधुनिक युगात महिला केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित न राहता शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग, व्यवसाय, आरोग्यसेवा, सामाजिक कार्य, प्रशासन आणि विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. अशा महिलांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा आणि त्यांच्या यशोगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने संस्थेच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
महिलांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून शिक्षण, स्वावलंबन आणि कर्तृत्वाच्या बळावर समाजामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक पारंपरिक वेशभूषा, उत्साहपूर्ण संगीत आणि दांडियाच्या तालावर विद्यार्थी, पालक व उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला.
या महोत्सवामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. स्त्रीशक्तीच्या सन्मानाबरोबरच भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. टिंकल राठोड यांनी केले व आभार प्रदर्शन समन्वयक सौ. अलका देव मॅडम यांनी केले . महिलांच्या संघर्षगाथा, कर्तृत्व, प्रेरणादायी विचार आणि स्त्रीशक्तीचा गौरव करणाऱ्या काव्यपंक्तींमुळे पुरस्कार वितरण सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली.
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
स्त्रीशक्तीचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.






