गुणवंत का.क.मंडळाची पाच क्षेत्रीय कार्यालये सुरू

चिंचवड,ता.१३ : गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगार व कामगार परिवाराच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी राज्यस्तरीय गुणवंत कामगार कल्याण मंडळाने विभागीय पाच कार्यालये सुरू केली आहेत.या क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून पूर्वीपासूनच कामाची सुरुवात झालेली असून साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण आदी क्षेत्रासह गुणवंत कामगारांना मिळणाऱ्या सुविधांचाही त्यामध्ये समावेश आहे. पिंपरी चिंचवड क्षेत्रातील महानगरपालिका क्षेत्रातील अण्णासाहेब मगर स्टेडियम हस्तांतरणाच्या मोबदल्यात महानगरपालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला कामगारासाठी सांस्कृतिक भवनाची उभारणी, राज्यस्तरीय गुणवंत कामगार परिषद,सामाजिक समस्येवर चर्चा सत्र, साहित्य संमेलन, गणेश मूर्ती दान अभियान, पर्यावरण, वृक्षारोपण,वृक्ष दिंडी, ई वेस्ट, प्लास्टिक वेस्ट संकलन,विशेष कार्यकारी अधिकारी पदांच्या नेमणुका आदि उपक्रम यशस्वीपणे राबविल्यानंतर मंडळाच्या पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी कामगार कल्याण मंडळ भवन, संभाजीनगर,चिंचवड येथे आयोजित गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांनी ही माहिती दिली.
डॉ.चव्हाण पुढे म्हणाल्या की, “मंडळाच्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या अधिपत्याखाली राज्यात सध्या पाच जिल्ह्यातून मंडळाचे कामकाज चालत असून श्रमिक वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी भविष्यात राज्यभर मंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.बैठकीत विविध समित्यांची निवड करण्यात आली.तेव्हा राज्यस्तरीय शिखर समितीचे अध्यक्षपद पुन्हा एकदा डॉ.भारती चव्हाण यांच्याकडेच आले असून तानाजी एकोंडे (कार्याध्यक्ष), महादेव धर्मे (उपाध्यक्ष), राजेश हजारे (सचिव),संजय गोळे (सहसचिव), महमदशरीफ मुलाणी (खजिनदार),श्रीकांत जोगदंड (सह खजिनदार) तर भरत शिंदे,सतीश देशमुख,सुरेश निकम आणि प्रमोद बनसोडे हे कार्यकारी सदस्य असतील. त्याचबरोबर नवनियुक्त पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके,पुणे शहराध्यक्ष संपत खैरे,पुणे जिल्हाध्यक्ष शंकर नाणेकर हे ही कार्यकारी शिखर समितीचे सदस्य असतील.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्वच्छता दूत म्हणून निवड केलेले बाळासाहेब साळुंके, नंदकिशोर धुमाळ आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त तानाजी एकोंडे यांचा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.तसेच शासन पुरस्कृत गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगार संदीप रांगोळे (टाटा मोटर्स),उमेश फाळके (टाटा मोटर्स), शिवराज शिंदे (प्रीमियम ट्रान्समिशन),संजय चव्हाण (किर्लोस्कर ऑइल इं.)आणि साखरचंद लोखंडे (म.रा.मा.परि.) यांचाही स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी शिवराज शिंदे,श्रीकांत कदम,शिवाजी पाटील आणि मुळीक मॅडम यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी एकोंडे तर सूत्रसंचालन राजेश हजारे यांनी केले आणि महेंद्र गायकवाड यांनी आभार मानले.

तानाजी एकोंडे,काळेवाडी
सं.क्र.९४२१९६५८२५

news portal development company in india