चिंबळी, दि. ३ (वार्ताहर)
मोई येथील श्री भैवरनाथ महाराज मंदिराच्या कलशारोहण द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अंखड हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवार (दि. ३) भक्तिमय वातावरणात पार पडली.
हरिनाम सप्ताहाच्या सांगता दिनी मंदिरात पहाटे काकड आरती व महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी आठ ते अकरा या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आले. सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन
हभप केशव महाराज उखळीकर यांचे प्रभावी व रसाळ कीर्तन संपन्न झाले. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या अखंड हरिनाम सप्ताहात चिंबळी, कुरुळी, निघोजे व परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात हरिनामाचा गजर, अभंग-भजन आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले. या धार्मिक उपक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ, श्री भैवरनाथ बांधकाम समिती तसेच भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.






