चिंबळी फाटा : दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री समर्थ ग्रुपतर्फे दिवाळीच्या निमित्ताने भव्य “किल्ले बनवा स्पर्धा” उत्साहात पार पडली. खेड तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर अनेक आकर्षक किल्ले साकारून छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन केले. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे दहावे वर्ष ठरले असून, या उपक्रमाला पालक व शिक्षकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळाला. स्पर्धक विद्यार्थ्यांच्या सहभागाचा गौरव करण्यासाठी श्री समर्थ ग्रुपतर्फे दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीचे सुरळीत आयोजन व्हावे यासाठी संपूर्ण तालुक्यातील विविध भागांतून ३३ बसची सोय करण्यात आली होती. या सहलीचा लाभ एकूण १३०० विद्यार्थ्यांनी घेतला. सहलदरम्यान विद्यार्थ्यांना शिवनेरी किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळाली. तसेच “किल्ले बनवा स्पर्धे”तील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक शिवशंकल्प मित्र मंडळ, सातारा तर द्वितीय क्रमांक गणेश मच्छिंद्र कोळी आणि तृतीय क्रमांक सहयोग मित्र मंडळ म्हाळुंगे यांचा समावेश होता. राष्ट्रवीर संघ, आळंदी यांनी त्यांच्या बाल सहकाऱ्यांच्या मदतीने लाठी, तलवार व अन्य शस्त्रांच्या सहकार्याने शौर्य प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रसंगी श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे, श्री समर्थ स्कूलच्या सचिव व श्री समर्थ पतसंस्था आणि श्री समर्थ मल्टीस्टेटच्या सदस्या सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे, श्री समर्थ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमोल गवारे, तसेच श्री समर्थ ग्रुप व श्री समर्थ स्कूलचे सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण, सहकार्यभाव आणि राष्ट्राभिमान जागृत करण्याचा उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाल्याचे श्री समर्थ ग्रुपतर्फे सांगण्यात आले.






