किशोरी मंच फेडरेशनमार्फत किशोरी-अनुकूल हेल्पलाईन सुरू करण्याबाबत खराबवाडी ग्रामपंचायतीकडे मागणी

मंथन फाउंडेशनच्या सक्षम (SAKSHAM) प्रकल्पांतर्गत मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड यांच्या आर्थिक सहकार्याने चाकण परिसरातील शाळांमध्ये किशोरवयीन मुला-मुलींसाठी विविध सक्षमीकरण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या किशोरी मंचाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता व सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य सुरू आहे.

या उपक्रमांतून निर्माण झालेल्या किशोरी मंच फेडरेशनच्या वतीने खराबवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मा. निलिमा जाधव यांना किशोरवयीन मुला-मुलींसाठी स्वतंत्र “किशोरी-अनुकूल हेल्पलाईन” सुरू करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
किशोरी मंच फेडरेशनचे सदस्य सक्षम (SAKSHAM) प्रकल्पाच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींशी नियमित बैठकांद्वारे चर्चा व संवाद साधत आहेत. या चर्चांमधून असे स्पष्टपणे समोर आले आहे की किशोरवयीन मुला-मुलींना प्रजनन व लैंगिक आरोग्य (ARSH), मासिक पाळी स्वच्छता, मानसिक ताण-तणाव, व्यसनाधीनता, कौटुंबिक तसेच नातेसंबंधांतील समस्या अशा अनेक गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो.

हे प्रश्न अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असल्यामुळे अनेक वेळा किशोरवयीन मुला-मुलींना ते पालक, शिक्षक किंवा मित्रांशी मोकळेपणाने व्यक्त करता येत नाहीत. सध्या उपलब्ध असलेली १०९८ चाइल्डलाईन ही सेवा लहान मुलांसाठी उपयुक्त असली तरी किशोरवयीन मुला-मुलींसाठी स्वतंत्र अशी कोणतीही हेल्पलाईन उपलब्ध नसणे ही मोठी उणीव असल्याचे किशोरी मंच फेडरेशनने नमूद केले.
त्यामुळे ग्रामपंचायतीकडे ठाम मागणी करण्यात आली आहे की, १०९८ चाइल्डलाईनप्रमाणेच किशोरवयीन मुला-मुलींसाठी स्वतंत्र “किशोरी-अनुकूल हेल्पलाईन” सुरू करण्यात यावी.

प्रस्तावित हेल्पलाईन पुढील वैशिष्ट्यांची असावी, अशी मागणी करण्यात आली आहे:
गोपनीय (Confidential) व किशोरी-अनुकूल स्वरूपाची
प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत चालवली जाणारी
ARSH, मानसिक आरोग्य, अभ्यासाचा ताण, व्यसनाधीनता तसेच कौटुंबिक व नातेसंबंधांतील समस्यांवर मार्गदर्शन देणारी
फोन व व्हॉट्सॲपसारख्या ऑनलाइन माध्यमांतून सहज उपलब्ध
अशी हेल्पलाईन सुरू झाल्यास बालविवाह रोखणे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे, किशोरवयीन मुला-मुलींचे मानसिक आरोग्य सुधारणे तसेच त्यांना योग्य निर्णय घेण्यास सक्षम करणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमासाठी मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. आशा भट यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खराबवाडी येथील मुख्याध्यापक श्री. अमोल भाटी, वर्गशिक्षिका सुनिता पवार तसेच

श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, नाणेकरवाडी येथील प्राचार्या विद्या पवार, अश्विनी मॅडम, शिक्षिका भाग्यश्री सूर्यवंशी उपस्थित होत्या.

तसेच गोल्डन व चांदनी किशोरी मंचच्या सदस्य – जान्हवी शेडगे, राजश्री संकपाळ, सिद्धी खरात, दुर्गा नवगरे, आराध्या पानसरे व हर्षदा पाटील तसेच मंथन फाउंडेशनच्या कार्यकर्त्या राजश्री चौगुले व वंदना सरोदे यांचीही उपस्थिती होती.

news portal development company in india