चिंबळी : शालेय शिक्षण विभागातर्फे गुरुवारी विविध शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदी डॉ. गणपत मोरे यांची बदली करण्यात आली असून मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालक पदी आर. आर. कंकाळ यांची बदली केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. अखेर गणपत मोरे यांची बदली झाल्याने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत.
नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक पदी संजय कुमार धर्मा राठोड यांची बदली केली आहे. राठोड हे परीक्षा परिषद कार्यालयात उपायुक्त पदी कार्यरत होते. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील शिक्षण उपसंचालक वंदना वाहूळ यांची योजना विभागात शिक्षण उपसंचालक पदी बदली करण्यात आली आहे. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील दीपक चावणे यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे शिक्षण उपसंचालक पदी बदली झाली आहे. तसेच निशादेवी बंडगर यांची राज्य परीक्षा परिषदेच्या उप आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
