श्री समर्थ ग्रुपतर्फे १,००० हून अधिक विद्यार्थ्यांना किल्ले शिवनेरीची मोफत सहल
चिंबळी फाटा : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, त्यांचे शौर्य, पराक्रम आणि विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान व जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री समर्थ ग्रुप चिंबळी फाटा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी किल्ले शिवनेरी येथे मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
श्री समर्थ ग्रुप (पतसंस्था, मल्टिस्टेट, स्कूल अँड कॉलेज, प्रतिष्ठान, वार्ता, असोसिएट व वाचनालय) यांच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे अकरावे वर्ष होते. मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित या सहलीमध्ये खेड व हवेली तालुक्यातील पंचक्रोशीतील ३० बसगाड्यांच्या माध्यमातून १,००० हून अधिक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
या उपक्रमादरम्यान किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही पार पडला. यामध्ये प्रथम क्रमांक जय गणेश प्रतिष्ठान, आळंदी, द्वितीय क्रमांक साई फिटनेस क्लब, कुरुळी आणि तृतीय क्रमांक श्रेया संदीप जगताप, खराबवाडी यांनी पटकावला. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे पोवाडे तसेच प्रेरणादायी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. किल्ले शिवनेरीसारख्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
यावेळी श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारी, सचिव सौ. विद्याताई गवारी, श्री. बबनराव गवारी, सौ. सुमनताई गवारी, ग्रुपच्या सर्व शाखांचे शाखा व्यवस्थापक तसेच शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्या उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रप्रेम आणि ऐतिहासिक वारशाबद्दल आदर निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. केवळ स्पर्धा आयोजित न करता विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांची मोफत सफर घडवून आणण्याचा श्री समर्थ ग्रुपचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक योगदानाचा आदर्श ठरत आहे.






