कराड | ८ जून २०२५
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राजधानी नाविन्यपूर्ण सहकारी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भोसरी येथील लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी संदीप राक्षे यांना “कर्मयोगी” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते ध्रुव दातार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंद पाटील, ग्रामविकास अधिकारी सतीश भोसले, आणि डाॅ. जान्हवी इंगळे यांची विशेष उपस्थिती लाभली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपला मनोगत व्यक्त करताना संदीप राक्षे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक तेजस्वी नाव म्हणजे यशवंतराव चव्हाण. एक नेता, एक विचारवंत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कर्मयोगी. त्यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये मिळालेला ‘कर्मयोगी’ पुरस्कार, हा माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय दिवस आहे. कराड ही केवळ एक भौगोलिक जागा नाही, ती एक संस्कारभूमी आहे जिथे यशवंतराव चव्हाणांसारख्या थोर पुरुषाने आपल्या विचारांचा, कर्तृत्वाचा आणि नीतिमत्तेचा दीप प्रज्वलित केला. संदीप राक्षे यांनी अनेक वर्षांपासून पर्यावरण, वृक्षसंवर्धन, सामाजिक साहित्यनिर्मिती आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी लेखन अशा विविध माध्यमांतून समाजसचेतना घडवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या लेखणीने तरुणांमध्ये सकारात्मक विचारांचे बीज पेरले, तर त्यांच्या पर्यावरणप्रेमी उपक्रमांनी ‘झाडं ही उपासना’ अशी जाणीव रुजवली. “कर्मयोगी” हा पुरस्कार केवळ एक सन्मान नसून, सामाजिक बांधिलकी, सातत्यपूर्ण कार्य, आणि मूल्याधिष्ठित योगदानाची एक जिवंत पावती आहे. यशवंतराव चव्हाणांच्या कार्यावर आधारित या पुरस्काराची प्रेरणा अत्यंत उंचीची असून, हा पुरस्कार मिळणे म्हणजेच कर्तृत्वाचा एक पवित्र स्वीकार.