चिंबळी फाटा : स्त्रियांना त्यांच्या क्षमतांना वाव ‘मिळाला, तर धडाडीने त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतातच, शिवाय आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वीही होऊन दाखवितात. आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याच्या प्रेरणेने सतत कार्यरत असणाऱ्या, ध्येयपूर्तीसाठी सर्वार्थाने झटणाऱ्या स्त्रिया इतरांसाठीही दिपस्तंभाचे कार्य करतात. शैक्षणिक क्षेत्रात निर्भयतेने आणि तितक्याच निर्मळतेने कार्यरत राहून आपल्या कामातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या ‘श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळा’च्या सचिव विद्याताई गवारे या त्यापैकीच एक.
आळंदी येथील पवळे कुटुंबात विद्याताईंचा जन्म झाला. आई अलका आणि वडील एकनाथ पवळे यांच्या संस्कारांनी विद्याताईंचे बालपण समृद्ध झाले. ‘विद्या’ हे नाव सार्थ करीत त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आळंदी येथे पूर्ण केले. एम.कॉम. बी.एड. डी.टी.एल., एम.बी.ए.पर्यंत शिक्षण घेत विद्यार्जनाचे ध्येय पूर्ण केले. सध्या विद्याताई पीएच.डी. करीत आहे.
सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजा राममोहन राय, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या आदर्शवत विचारवंतांचे विचार त्यांच्यात खोलवर रुजले होते. त्यांची देदीप्यमान दिशादर्शक कामगिरी पाहून आपणही समाजहितासाठी काही केले पाहिजे, ही जाणीव त्यांच्यातही निर्माण झाली. त्यातूनच शिक्षण क्षेत्रात काहीतरी भरीव कामगिरी करण्याचे स्वप्न विद्याताईंनी जोपासले.
लग्नानंतर पती शिवाजीराव गवारे आणि दोन्ही कुटुंबांच्या पाठिंब्यामुळे २०१० मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले आणि ‘श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळा’ची स्थापना झाली. आज पुणे जिल्ह्यात या संस्थेच्या आठ शाखा असून, हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. ३०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या संस्थांत कार्यरत आहेत. त्यापैकी ९० टक्के कर्मचारी महिला असून, त्या उच्चशिक्षित आहेत आणि सक्षमपणे आपली जबाबदारी सांभाळत आहेत. नर्सरी ते बारावीपर्यंत शिक्षण देणारी ही संस्था लवकरच पदव्युत्तर अभ्यास क्रमापर्यंत शिक्षण देण्याच्या मार्गावर असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हाच संस्थेचा मुख्य हेतू आहे. संस्थेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज यशस्वी करिअर करीत असल्याचा विद्याताईंना अभिमान आहे.
विद्याताईंच्या यशात त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची आहे. पती शिवाजीराव गवारे, तसेच सासू-सासरे, नणंद, भाऊ-भावजया आणि नातेवाईक यांनी दिलेली साथ यांमुळे त्यांना घर आणि काम यांचा समतोल राखता आल्याचे त्या सांगतात.
विद्याताईंच्या या प्रेरणादायी प्रवासाची दखल घेत ‘जामखेड प्रतिष्ठान’चा ‘यशश्री पुरस्कार’ आणि ‘ईजीएन इंडिया’ यांच्यातर्फे ‘आऊटस्टैंडिंग लीडरशिप ॲवॉर्ड – २०२४’ देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. विद्याताई आपले यश कुटुंब, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सहकारी आणि प्रेरक व्यक्तींना समर्पित करतात.





